आरळे–वडूथ पुलालगत रस्ता खचला; प्रशासनाचा हलगर्जीपणा, तर ग्रामस्थांनी घेतली पुढाकाराची भूमिका

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा : सातारा–लोणंद मार्गावरील आरळे–वडूथ येथील कृष्णा नदीवरील पुलापासून अवघ्या १०० फुटांवर रस्ता खचल्याने गंभीर धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पाऊस, नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे परिस्थिती अधिक चिंताजनक बनली असतानाही जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

या मार्गावरील अवजड वाहतूक तातडीने बंद करण्याबाबत NHAI ने जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे. मात्र, या इशाऱ्यानंतरही प्रशासनाने ना वाहतुकीवर निर्बंध घातले, ना धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना केल्या. त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता कायम आहे.

दरम्यान, ही बाब समजताच वडूथ येथील सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे आणि उपसरपंच अभिजित साबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. रस्ता खचलेल्या भागात दगड टाकून तात्पुरत्या स्वरूपात बंदिस्त केले आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही तसेच वाहनचालकांना धोका कमी होईल, अशा पद्धतीने तातडीची उपाययोजना केली. प्रशासनाची जबाबदारी असलेले काम ग्रामस्थांना करावे लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

पावसाचे दिवस असल्याने आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने रस्ता आणखी खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

“अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ पाहणी करून अवजड वाहतूक बंद करावी, रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी आणि कायमस्वरूपी सुरक्षेची उपाययोजना करावी,” अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *