सातारा, प्रतिनिधी :
सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींच्या स्वाभिमानाच्या संरक्षणासाठी ही निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली.
जगताप म्हणाले की, पूर्वी जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची प्रमुख यंत्रणा होती. जिल्हा परिषद सदस्यांना विकासकामांबाबत व्यापक अधिकार होते. मात्र सध्या अनेक निर्णय मंत्री व पालकमंत्र्यांच्या पातळीवर घेतले जात असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींचे अधिकार मर्यादित झाले आहेत. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर निवडून आलेल्या प्रतिनिधींना त्यांच्या भागाचा विकास करण्यासाठी आवश्यक स्वातंत्र्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“लोकप्रतिनिधी मोठ्या मेहनतीने निवडून येतात. त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक अधिकार आणि सन्मान मिळणे गरजेचे आहे. त्याच स्वाभिमानाच्या लढ्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे,” असे जगताप यांनी सांगितले.
सातारा आणि सांगली जिल्ह्यांना सुसंस्कृत राजकारणाचा समृद्ध वारसा लाभला असून या परंपरेचे जतन करण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. या भागातील राजकीय वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींना मतदार योग्य उत्तर देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
फोडाफोडीच्या राजकारणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना, “महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षनिष्ठ आहेत. त्यामुळे आम्हाला कोणतीही भीती नाही. उलट अशा प्रकारच्या घडामोडी सत्ताधारी पक्षांमध्ये होण्याची शक्यता अधिक आहे,” असा दावा त्यांनी केला.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राजकीय घटनांचा उल्लेख करताना, त्या काळात ज्यांच्यावर अन्याय झाला होता ते आपल्याला पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र केवळ त्याच मतांवर अवलंबून न राहता विविध घटकांशी संपर्क साधून व्यापक पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या भूमिकेबाबत बोलताना, महायुतीतील सर्व घटक पक्षांची अधिकृत भूमिका एकसमान राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वैयक्तिक नाराजी असली तरी युतीतील पक्ष वेगळी भूमिका घेतील, असे वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार, लोकप्रतिनिधींचा स्वाभिमान आणि सातारा-सांगलीच्या सुसंस्कृत राजकारणाचे संरक्षण या प्रमुख मुद्द्यांवर ही निवडणूक लढविणार असल्याचे अभयसिंह जगताप यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.












Leave a Reply