महामार्गाच्या गटारावरच कंपाऊंड? वासोळेतील प्रकाराची चौकशी करण्याची मागणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वासोळे | प्रतिनिधी

सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५डीच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना वासोळे येथे महामार्गालगत असलेल्या एका व्यावसायिक आस्थापनाने महामार्गाच्या काँक्रीट गटारावरच कंपाऊंड व लोखंडी संरचना उभारल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून संबंधित यंत्रणेकडून तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे.

महामार्गावरील गटारे ही पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत राहावा आणि रस्त्याचे संरक्षण व्हावे यासाठी बांधली जातात. अशा गटारांवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम झाल्यास पाण्याचा निचरा अडथळित होण्याची, रस्ता खराब होण्याची तसेच वाहतुकीच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, महामार्गाचे काम सुरू असतानाच हे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम महामार्गाच्या हद्दीत आहे का, त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि संबंधित प्रशासनाने तातडीने संयुक्त पाहणी करून वस्तुस्थिती जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नियमबाह्य बांधकाम अथवा अतिक्रमण आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच महामार्गाच्या गटारावरील अडथळे तातडीने हटवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *