fd80d696-37b1-4712-812d-a9c40f40bbb8🇮🇳 ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने सामाजिक कार्याची दखल; रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी बसथांबाही मार्गी
वडूथ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने वडूथ प्राथमिक आरोग्य केंद्रात सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप युवा मोर्चा, सातारा सचिव मदन भिमाजी साबळे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.
हिरवाईने नटलेला, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक परिसर हे वडूथ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैशिष्ट्य आहे. जवळच असलेल्या जरंडेश्वर डोंगररांग तसेच वडूथ परिसरातील हिरव्यागार टेकड्यांमुळे आरोग्य केंद्र परिसराला विशेष निसर्गसौंदर्य लाभले आहे.
आरोग्य केंद्राचा परिसर अधिक हिरवागार व पर्यावरणपूरक करण्यासाठी वडूथ ग्रामपंचायत आणि वडूथ हायस्कूलच्या माध्यमातून वृक्षारोपण तसेच झाडांच्या संगोपनाचे नियोजन करण्यात आले आहे.
रुग्णांच्या सोयीसाठी बसथांबा सुरू
वडूथ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना बसथांबा नसल्यामुळे मोठ्या अंतरावर जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन आरोग्य केंद्राजवळ अधिकृत बसथांबा सुरू करण्यासाठी मदन साबळे यांनी संबंधित प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला.
या मागणीची विभाग नियंत्रक, सातारा विभाग, MSRTC यांनी तातडीने दखल घेऊन सहकार्य केले. त्यानंतर आरोग्य केंद्राजवळ बसथांबा सुरू करण्यात आला असून बसथांब्याचा फलकही लावण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांसह ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
“समाजासाठी केलेल्या कामाची ही पोचपावती”
ध्वजारोहणाचा मान मिळाल्याबद्दल मदन साबळे यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “देशावर आणि समाजावर निस्वार्थ प्रेम ठेवून केलेल्या सामाजिक कार्याची ही एक प्रकारची पोचपावती आहे. समाजातील एखादी अडचण लक्षात आल्यानंतर ती केवळ मांडणे नव्हे, तर प्रशासनापर्यंत पोहोचवून ती प्रत्यक्ष मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करणे, हेच माझे कर्तव्य आहे.”
वडूथ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी बसथांबा सुरू होणे, परिसरात वृक्षारोपण व झाडांच्या संगोपनाचे नियोजन आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने झालेला ध्वजारोहण कार्यक्रम यामुळे परिसरातील नागरिकांच्या सोयी-सुविधांसोबतच पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी, नागरिक तसेच उपस्थित मान्यवरांनी सहभाग घेतला.
🇮🇳 जय हिंद! जय महाराष्ट्र! जय सातारा! 🇮🇳












Leave a Reply