NHAI चा गंभीर इशारा! वडूथ व वाढे येथील ऐतिहासिक पुलांवर अवजड वाहतूक बंद करण्याची शिफारस; आता जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा | प्रतिनिधी

सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्ग (NH-965D) वरील वडूथ येथील कृष्णा नदी पूल आणि वाढे येथील वेण्णा नदी पूल यांच्या सुरक्षिततेबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) गंभीर भूमिका घेतली आहे. 9 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी, सातारा यांना पाठविण्यात आलेल्या अधिकृत पत्रात दोन्ही ऐतिहासिक दगडी कमानीच्या पुलांची सद्यस्थिती चिंताजनक असल्याचे नमूद करत अवजड व्यावसायिक वाहनांची वाहतूक तात्काळ बंद अथवा पर्यायी मार्गाने वळविण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मदन भीमाजी साबळे यांनी 22 मे 2026 रोजी NHAI कडे प्रथम लेखी निवेदन सादर करून दोन्ही पुलांवरील अवजड वाहतूक तात्काळ बंद करणे, स्वतंत्र Structural Safety Audit करणे, ड्रेनेज स्पाऊट्स स्वच्छ करणे, पुलांवरील झाडे-वनस्पती हटविणे तसेच आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, NHAI तसेच इतर संबंधित विभागांकडे सातत्याने निवेदने देऊन या विषयाचा पाठपुरावा केला.

NHAI च्या माहितीनुसार, डिसेंबर 2024 मध्ये Mobile Bridge Inspection Unit (MBIU) मार्फत दोन्ही पुलांची सविस्तर तांत्रिक तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर 2026 च्या पावसाळ्यात करण्यात आलेल्या पाहणीत पुलांमध्ये Seepage (पाण्याची गळती), Minor Structural Cracks (किरकोळ संरचनात्मक तडे) तसेच दगडी कमानींच्या बांधकामात झीज वाढल्याचे निदर्शनास आले. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे NHAI ने स्पष्ट केले आहे.

डिसेंबर 2024 च्या तांत्रिक तपासणी अहवालात पुलावरील डांबरी पृष्ठभाग खराब होणे, खड्डे, Fatigue Cracks, Raveling, दगडी बांधकामातील मोर्टारची झीज, पुलांवर वाढलेली झाडे-वनस्पती तसेच पावसाचे पाणी वाहून नेणारे ड्रेनेज स्पाऊट्स गाळामुळे बंद असल्याची गंभीर निरीक्षणे नोंदविण्यात आली होती. विशेष म्हणजे वाढे येथील वेण्णा नदी पुलावरील 100 टक्के तर वडूथ येथील कृष्णा नदी पुलावरील 50 टक्के ड्रेनेज स्पाऊट्स बंद असल्याचे निरीक्षण अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

NHAI ने नवीन समांतर पूल पूर्ण होईपर्यंत आवश्यक दुरुस्ती करून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्याची, मात्र अवजड व्यावसायिक वाहनांची वाहतूक तातडीने पर्यायी मार्गाने वळविण्याची स्पष्ट शिफारस जिल्हा प्रशासनाला केली आहे.

दरम्यान, NHAI च्या या अधिकृत शिफारशीनंतर सामाजिक कार्यकर्ते मदन भीमाजी साबळे यांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी, सातारा यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करून शिफारशीची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. दोन्ही पुलांवर अवजड वाहनबंदी लागू करणे, स्वतंत्र तांत्रिक सुरक्षा तपासणी करणे, ड्रेनेज स्पाऊट्स स्वच्छ करणे, पुलांवरील वनस्पती हटविणे, आवश्यक दुरुस्ती करणे तसेच वजनमर्यादा आणि इशारा फलक तातडीने लावावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

NHAI कडून अधिकृतरीत्या गंभीर शिफारस करण्यात आल्यानंतर आता सर्वांचे लक्ष जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाकडे लागले आहे. नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता, ऐतिहासिक वारशाचे संरक्षण आणि भविष्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोणताही विलंब न करता NHAI च्या शिफारशीवर तातडीने निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते मदन भीमाजी साबळे तसेच परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *