छत्रपती उदयनराजेंचे छायाचित्र वगळल्याने साताऱ्यात राजकीय खळबळ; समर्थकांचा संताप

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाने राबविलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान” कार्यक्रमातील स्वागत फलकावर सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे छायाचित्र नसल्याने साताऱ्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र चर्चा रंगली आहे. छत्रपतींच्या राजधानीत, छत्रपतींच्याच नावाने आयोजित करण्यात आलेल्या अभियानात त्यांच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांना स्थान न दिल्याबद्दल त्यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून, हा राजकीय शिष्टाचाराचा भंग असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सातारा विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त “छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान” आयोजित करण्यात आले होते. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती, विविध दाखल्यांचे वितरण तसेच महसूल विभागाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विधान परिषदेच्या माजी उपसभापती तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांना प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.

उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत विठ्ठल मंगलम कार्यालय, सातारा येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या मोठ्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री योगेश कदम, प्रमुख पाहुण्या डॉ. नीलम गोऱ्हे तसेच दिवंगत अजितदादा पवार यांचे छायाचित्र झळकविण्यात आले होते.

मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे छायाचित्र फलकावर नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज असून सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी आहे. त्यामुळे छत्रपतींच्या नावाने आयोजित करण्यात आलेल्या अभियानात त्यांच्या घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा समावेश अपेक्षित होता, अशी भावना समर्थकांकडून व्यक्त करण्यात आली.

समर्थकांच्या मते, राजकीय शिष्टाचारानुसार स्थानिक खासदारांचे छायाचित्र फलकावर असणे स्वाभाविक होते. तसे झाले असते तर शासन-प्रशासनाकडून छत्रपतींच्या घराण्याबद्दल आदर व्यक्त झाल्याचा संदेश गेला असता. मात्र, त्यांना वगळण्यात आल्याने हा प्रकार हेतुपुरस्सर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

जिल्ह्यातील राजकारणात खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांच्या समर्थकांना सातत्याने डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही समर्थकांनी केला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका तसेच इतर राजकीय घडामोडींमध्येही त्यांना बाजूला ठेवण्याचे प्रयत्न होत असल्याचा दावा करण्यात आला.

पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या मोजक्या खासदारांमध्ये उदयनराजे भोसले यांचा मोठा राजकीय अनुभव असूनही त्यांना केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळाली नाही, याबाबतही समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्रात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, “छत्रपतींच्या राजधानीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजित करण्यात आलेल्या अभियानात साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना डावलणे हे लाखो शिवप्रेमींच्या भावना दुखावणारे आहे. भविष्यात अशा कोणत्याही शासकीय कार्यक्रमात त्यांचा योग्य सन्मान राखला गेला नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारले जाईल. छत्रपतींच्या घराण्याचा मान हा आमच्यासाठी अस्मितेचा विषय असून त्यावर कुठलाही आघात आम्ही खपवून घेणार नाही,” असा इशारा छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांचे विश्वासू कार्यकर्ते मदन भीमाजी साबळे यांनी दिला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *