सातारा – प्रतिनिधी
सातारा येथील सावकार होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षक दिनानिमित्त शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारत दिवसभर महाविद्यालयाचे कामकाज सांभाळले. या उपक्रमातून शिक्षकांविषयीचा आदर, जबाबदारीची जाणीव आणि नेतृत्वगुणांचा सुंदर अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.
विशेष कार्यक्रमात नाशिक येथील योगविद्या धाम केंद्रातून ‘डिप्लोमा इन योगा’ पदवी प्राप्त केलेल्या महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांचा योगाचार्य शैलजा ठोके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना शैलजा ठोके यांनी “डॉक्टरांनी केवळ रुग्णांवर उपचार करण्यापुरते मर्यादित न राहता समाजाला निरोगी जीवन जगण्याची प्रेरणा दिली पाहिजे. त्यासाठी डॉक्टरांनी प्रथम स्वतः निरोगी राहणे आवश्यक आहे. नियमित योगासने आणि प्राणायामामुळे शरीरासोबत मनाचे ही आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा ‘ आरोग्यदूत ’ या भावनेतून त्यांनी योगविद्येचा अभ्यास करावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. गुलनार बागवान, डॉ. राजश्री देवी यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पूजा पिसाळ हिने केले. यावेळी डॉ. श्वेता बागडे, डॉ.सलोनी राजमाने , डॉ. गुलनार बागवान, यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.डॉ . शितल इनामदार यांनी योगा- प्राणायाम याचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.मनिष इनामदार, मुद्रा जाधव, आविष्कार शिंदे, रणजित सुतार, श्रेया फुटक,निकिता थोरात, शिवानी देवकर यांनी परिश्रम घेतले.
१५० हून अधिक विद्यार्थी पुर्ण करणार ‘डिप्लोमा इन योगा’
सावकार होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी प्रोत्साहन दिले जाते. गतवर्षी ३० विद्यार्थ्यांनी ‘डिप्लोमा इन योगा’ पदवी घेतली. यंदा मात्र विद्यार्थ्यांचा उत्साह आणखी वाढला असून तब्बल १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी नाशिकच्या योगविद्या धाम केंद्राच्या डिप्लोमा इन योगा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. मनीष इनामदार यांनी दिली.
४ विद्यार्थ्यांच्या संशोधनाला विद्यापीठाची मान्यता
शॉर्ट टर्म रिसर्च ग्रँट अंतर्गत या कॉलेजच्या ४ विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. यामध्ये नव्या पाठणी यांच्या ऑस्टिओआर्थरायटिस(सांध्यांची झीज), किशोरी सहाणे यांच्या ओबेसिटी(लठ्ठपणा), श्रेया मारुती फुटक यांच्या ॲनिमिया (रक्तक्षय) तसेच सुजन मुल्ला यांच्या मायग्रेन (अर्धशिशी) या विषयांवरील संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.











Leave a Reply