सातारा : सातारा–लोणंद (NH-965D) मार्गावरील वडूथ येथील कृष्णा नदी व वेण्णा नदीवरील तब्बल १८१ वर्षे जुने दगडी (Stone Masonry) पूल आज गंभीर अवस्थेत असून, या पुलांवरून सुरू असलेली अवजड वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, साताराचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते मदन भीमाजी साबळे यांनी केली आहे.
पावसामुळे दोन्ही पुलांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पुलांवरील ताण वाढत असून नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याचे साबळे यांनी म्हटले आहे.
या संदर्भात २२ मे २०२६ रोजी NHAI तसेच संबंधित प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले होते. या विषयाची वृत्तपत्रांनीही दखल घेतली होती. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मदन साबळे म्हणाले, “इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देऊ नका. इशारे दुर्लक्षित करून एखादी दुर्घटना घडल्यावर कारवाई करण्यापेक्षा आजच प्रतिबंधात्मक उपाययोजना करा. या १८१ वर्षे जुन्या पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल जाहीर करावा. तोपर्यंत अवजड वाहतुकीस पूर्ण बंदी घालावी.”
याबाबत NHAI, जिल्हाधिकारी सातारा, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने संयुक्त पाहणी करून निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या जीवाशी कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
– मदन भीमाजी साबळे
सचिव, भारतीय जनता युवा मोर्चा, सातारा
सामाजिक कार्यकर्ते, सातारा












Leave a Reply