पर्यावरण दिन साजरा; पण शेकडो वृक्षांच्या कत्तलीवर कारवाईचा पत्ता नाही!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा-लोणंद मार्गावरील वृक्षतोडीप्रकरणी नागरिक संतप्त; पर्यावरणप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनीही व्यक्त केली चिंता

सातारा : एका बाजूला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा आणि हिरवाई वाढविण्याच्या शपथा घेतल्या जात असताना, दुसऱ्या बाजूला सातारा-लोणंद मार्गावरील शिवथर ते वाढे फाटा परिसरात झालेल्या  वृक्षांच्या तोडीप्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस मदन भिमाजी साबळे यांनी वन विभागाकडे लेखी तक्रार, छायाचित्रे व अन्य पुरावे सादर करून अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. मात्र पर्यावरणाला मोठा फटका बसलेल्या या गंभीर प्रकरणात संबंधित विभागांकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा कारवाईची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

सातारा-लोणंद मार्गावरील शिवथर ते वाढे फाटा परिसरात रस्त्यालगत उभी असलेली अनेक जुनी, विशाल व पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाची झाडे तोडण्यात आली. या वृक्षतोडीसाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, पर्यावरणीय नियमांचे पालन करण्यात आले का, तसेच प्रत्यक्षात किती वृक्षांची कत्तल करण्यात आली याबाबत नागरिकांना अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

या संदर्भात पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेले अभिनेते व वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांच्याशीही मदन साबळे यांनी चर्चा केली. वृक्षलागवड आणि पर्यावरण संरक्षणासाठी राज्यभर काम करणाऱ्या शिंदे यांनी या प्रकाराबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. मोठ्या प्रमाणावर झालेली वृक्षतोड ही पर्यावरणासाठी धोकादायक बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केल्याची माहिती साबळे यांनी दिली. तसेच सातारा-लोणंद मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून हा संपूर्ण मार्ग पुन्हा हिरवागार करण्यासाठी आपण सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितल्याचे साबळे यांनी स्पष्ट केले.

पर्यावरण दिनानिमित्त लाखो रुपयांचे वृक्षारोपण कार्यक्रम राबविले जात असताना, दुसरीकडे वृक्षांच्या तोडीच्या प्रकरणात कारवाईचा अभाव दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “सामान्य नागरिकाने एखादे झाड तोडले तर तात्काळ कारवाई होते, मग  झाडांच्या तोडीबाबत प्रशासन एवढे शांत का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. किती झाडे तोडण्यात आली, त्यासाठी कोणत्या विभागाने परवानगी दिली, पर्यावरणीय अटींचे पालन झाले का, तसेच संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

यासोबतच तोडण्यात आलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात नियमानुसार व त्याहून अधिक प्रमाणात वृक्षलागवड करण्यात यावी, त्या वृक्षलागवडीचे सार्वजनिक लेखापरीक्षण व्हावे आणि लावलेली झाडे प्रत्यक्षात जगली आहेत की नाही याची माहितीही नागरिकांसमोर मांडावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

पर्यावरणाचे संरक्षण आणि विकास यामध्ये समतोल राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना, पर्यावरण दिनानंतरही या गंभीर प्रकरणात संबंधित विभाग कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा केवळ मंचावरील भाषणांपुरत्या न राहता त्या प्रत्यक्ष कृतीत उतरल्या पाहिजेत. अन्यथा ‘पर्यावरण दिन’ हा केवळ औपचारिकता ठरेल, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून वृक्षतोडीमागील सत्य जनतेसमोर आणून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *