वडूथ, दि. ७ जुलै : सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती सातारा व पशुवैद्यकीय दवाखाना, वडूथ यांच्या संयुक्त विद्यमाने वैरण विकास योजनेंतर्गत कार्यक्षेत्रातील पशुपालकांना मोफत चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत मका बियाण्याच्या ६१ बॅग, न्यूट्रीफीडच्या ५५ बॅग तसेच शुगरग्रास बियाण्याच्या ३७ बॅगांचे मोफत वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य मा. राहुल नाना शिंदे, पंचायत समिती सदस्य मा. राजेशभाऊ पवार, वडूथच्या लोकनियुक्त सरपंच मा. शुभांगीताई साबळे, भाजपा युवा मोर्चा साताराचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते मदन भिमाजी साबळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत भोईटे तसेच कार्यक्षेत्रातील अनेक पशुपालक उपस्थित होते.
वनमहोत्सवानिमित्त दवाखाना परिसरात पवित्र बेल वृक्षाचे वृक्षारोपण पंचायत समिती सदस्य मा. राहुल नाना शिंदे व भाजपा युवा मोर्चा साताराचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते मदन भिमाजी साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उपस्थितांना बेलाच्या रोपांचेही वाटप करण्यात आले.
यावेळी मा. राहुल नाना शिंदे व मा. राजेशभाऊ पवार यांनी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या तसेच पशुपालकांच्या विविध समस्या जाणून घेत आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे आभार पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत भोईटे यांनी मानले. तसेच पशुपालकांनी शासनाच्या विविध पशुसंवर्धन योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नियमित संपर्कात राहावे, असे आवाहन त्यांनी केले.












Leave a Reply