सातारा प्रतिनिधी | आनेवाडी
आनेवाडी टोलनाक्यावर वाहतूक नियंत्रणाच्या नावाखाली काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहनधारकांना थांबवून कागदपत्रांची तपासणी केली जात असून, कारवाईची भीती दाखवत पैशांची उकळपट्टी केली जात असल्याचे गंभीर आरोप वाहनधारकांकडून करण्यात येत आहेत. या कथित प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, “वाद नको, त्रास नको” म्हणून अनेक वाहनधारक पैसे देऊन पुढे जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
जिल्ह्यात नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधीक्षकांनी बेकायदेशीर धंदे आणि गैरप्रकारांवर कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली असताना, दुसरीकडे काही वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या या आरोपांमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेलाच तडा जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
वाहनधारकांचे म्हणणे आहे की, अनेकदा सर्व वैध कागदपत्रे आणि वाहन परवाने दाखवूनही वाहनधारकांना विनाकारण बराच वेळ अडवून ठेवले जाते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असून, मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे.
टोलनाक्यावर सुरू असलेल्या कथित वसुलीमागे नेमके कोण आहे, या पैशांचा लाभ कुणापर्यंत पोहोचतो, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. तसेच नव्या पोलीस अधीक्षकांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेऊन टोलनाक्यावर सुरू असलेल्या कथित गैरप्रकाराला आळा घालावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
चौकट : चौकशीच्या नावाखाली वेळेचा अपव्यय
“सर्व कागदपत्रे, लायसन्स दाखवूनही जवळपास दहा मिनिटे चौकशी करण्यात आली. आनेवाडी टोलनाक्याच्या दोन्ही बाजूंना चार-पाच पोलीस कर्मचारी वाहने थांबवून विनाकारण चौकशी करताना दिसतात. हे वाहतूक नियंत्रण आहे की वसुली, हेच समजत नाही.”
– प्रतीक इंदलकर, वाहनधारक, सातारा












Leave a Reply