सातारा : महाबळेश्वर एसटी डेपोतील एका वाहतूक निरीक्षकाने पत्रकारांबाबत आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य केल्याने पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करत सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषद यांनी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली.
सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्या सूचनेनुसार महाबळेश्वर व सातारा येथे पत्रकारांनी तीव्र निषेध आंदोलन केले. यावेळी संबंधित अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली. पत्रकारांनी सातारा आगारात निवेदन देत निषेध नोंदवला.
पत्रकारांच्या भावना आणि मागणीची गंभीर दखल घेत संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात येईल, असे आश्वासन विभाग नियंत्रकांनी दिल्याची माहिती पत्रकार संघटनांकडून देण्यात आली.
पत्रकारांच्या एकजुटीचे दर्शन घडवणाऱ्या या आंदोलनाला अल्पावधीत मोठा प्रतिसाद मिळाला. साताऱ्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले असून, या लढ्यात सहभागी झालेल्या सर्व पत्रकारांचे संघटनांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.












Leave a Reply