वडूथ–जरंडेश्वर रस्ता दोन वर्षांपासून मृत्यूचा सापळा ; तातडीच्या दुरुस्तीची मागणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IMG_1683सातारा :

वडूथ ते जरंडेश्वर रेल्वे स्टेशनदरम्यानचा रस्ता मागील दीड वर्षांहून अधिक काळ अत्यंत जीर्ण अवस्थेत असून नागरिकांसाठी तो अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबराचा थर आणि तुटलेले कडे यामुळे दररोज शेकडो नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावरून अनेक कामगार पहाटे व रात्रीच्या शिफ्टमध्ये प्रवास करतात. तसेच वडूथ येथील आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रुग्ण, गर्भवती महिला व ज्येष्ठ नागरिकांनाही याच रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था ही केवळ वाहतुकीची समस्या नसून नागरिकांच्या सुरक्षितता आणि आरोग्याशी संबंधित गंभीर बाब बनली आहे.
या रस्त्याबाबत वेळोवेळी निवेदने देण्यात आली, अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले आणि प्रसारमाध्यमांतूनही सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
भाजपा युवा मोर्चाचे सातारा जिल्हा सचिव मदन भिमाजी साबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून उच्च दर्जाचे आणि कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे. भविष्यात या रस्त्यामुळे कोणतीही गंभीर दुर्घटना किंवा जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी सातारा तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर असेल आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा इशाराही यावेळी मदन साबळे यांनी दिला आहे.
दरम्यान, रस्त्याचे काम तात्काळ सुरू न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला असून, “आणखी किती अपघात झाल्यावर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *