रयतचा वटवृक्ष ए.आय.च्या युगातही बहरतोय!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षकांचा पर्याय नाही, तर सहाय्यभूत साधन — डॉ. भूषण केळकर

सातारा | दि. २२

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर काळाची गरज असली, तरी त्यावर अवलंबून राहणे योग्य नाही. शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर निश्चितच वाढेल; मात्र शिक्षकांची जागा तंत्रज्ञान कधीही घेऊ शकणार नाही. तंत्रज्ञान हे शिक्षकांसाठी सहाय्यभूत साधन आहे, पर्याय नाही. विद्यार्थ्यांवर मानवी भावभावनांचे संस्कार करण्याचे काम तंत्रज्ञान करू शकत नाही, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ डॉ. भूषण केळकर यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंती सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे हा सोहळा उत्साहात पार पडला.

ए.आय.च्या क्षेत्रात रयतचेही पाऊल

जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेची मोठ्या प्रमाणावर साधने वापरली जात असून, या क्षेत्रात रयत शिक्षण संस्थेचेही कार्य सुरू आहे. भविष्यात या माध्यमातून अनेक पथदर्शी साधने विकसित होतील, असा विश्वास डॉ. केळकर यांनी व्यक्त केला.

“कर्मवीर आण्णांनी उभारलेली रयत ही लोकसहभागातून चालणारी एक प्रकारची संसद आहे. कर्मवीरांचा वटवृक्ष आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही बहरत आहे. रयत माऊलींनी संस्थेच्या उभारणीसाठी केलेला निःसीम त्याग आणि कर्मवीरांच्या कार्याचे मूल्यमापन कोणतेही तंत्रज्ञान परिपूर्ण करू शकणार नाही,” असे डॉ. केळकर यांनी सांगितले.

रयतच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा

अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या आगामी वाटचालीची माहिती देताना शैक्षणिक गुणवत्ता विकास आराखडा, सर्व शाखांमध्ये परस्परसंवादी फलक, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण, संगणकीय व्यवस्थापन प्रणाली, माजी विद्यार्थी संघटना, रयत स्पर्धा परीक्षा अकादमी तसेच संशोधन व विकासासंदर्भातील नवीन धोरणांची माहिती दिली.

यावेळी स्पर्धा परीक्षेतून वर्ग एकच्या पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सातारा शहरातून प्रभातफेरी

कर्मवीर जयंतीनिमित्त रयत सेवक, विद्यार्थी, अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून सातारा शहरात कर्मवीरांच्या चित्ररथासह प्रभातफेरी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती प्रतापसिंह महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, लहूजी वस्ताद आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास खासदार सुप्रियाताई सुळे, डॉ. एम. बी. शेख, अॅड. भगीरथ शिंदे, डॉ. अनिल पाटील, डॉ. ज्ञानदेव म्हस्के, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, बी. एन. पवार, प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, सचिव किशोर राजेनिंबाळकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, कर्मवीर कुटुंबीय व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक किशोर राजेनिंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले. आभार बी. एन. पवार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *