नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रश्न ऐरणीवर; अनावश्यक रम्बलर हटवून त्याऐवजी आधुनिक रस्ता सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी
सातारा : जुना आरटीओ चौक ते वाढेफाटा या अवघ्या दीड किलोमीटरच्या मार्गावर तब्बल २२ रम्बलर बसविण्यात आल्याने वाहनचालक आणि या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा रस्ता तयार होऊन वर्षापेक्षा अधिक काळ झाला असताना सुरुवातीला या प्रमाणात रम्बलर नव्हते. यापूर्वी नागरिकांच्या तक्रारीनंतर काही रम्बलर काढण्यात आले होते; मात्र सुमारे आठवडाभरापूर्वी पुन्हा रम्बलर बसविण्यात आल्याने दीड किलोमीटरमध्ये २२ रम्बलरची आवश्यकता नेमकी का निर्माण झाली? याबाबत संबंधित विभागाने स्पष्टता देण्याची मागणी होत आहे.
वेग कमी करणे हा रस्ता सुरक्षेचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र कोणत्या ठिकाणी किती रम्बलर आवश्यक आहेत, याचे वाहतूक परिस्थिती, अपघातांची नोंद आणि तांत्रिक निकषांच्या आधारे परीक्षण होणे आवश्यक आहे. हा नवले ब्रिजसारखा तीव्र उताराचा परिसर आहे का, की दीड किलोमीटरमध्ये २२ रम्बलरची आवश्यकता निर्माण व्हावी? हा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
रम्बलरवर आदळल्यानंतर नव्हे, आधीच चालकाला सावध करा!
दुचाकीस्वार आणि वाहनांमधील प्रवाशांना वारंवार येणाऱ्या रम्बलरमुळे सतत धक्के बसत असून, प्रवासादरम्यान अस्वस्थता निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रम्बलरवर वाहन आदळल्यानंतर नव्हे, तर त्याआधीच चालकाला सावध करण्यावर भर देणे आवश्यक आहे.
यासाठी आवश्यक ठिकाणी ‘हळू वाहन चालवा’, ‘वेगमर्यादा’, ‘अपघातप्रवण क्षेत्र’ असे रात्रीही स्पष्ट दिसणारे परावर्तित फलक, सौरऊर्जेवरील चमकते चेतावणी दिवे, ‘कॅट्स आय’, रिफ्लेक्टिव्ह रोड स्टड, स्पष्ट रस्ता पट्टे आणि रस्त्याच्या कडेला सुरक्षा खांब अशा आधुनिक उपाययोजना करण्यात याव्यात.
शाळा, महाविद्यालये व गर्दीच्या ठिकाणी पादचारी सुरक्षेला प्राधान्य
शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा किंवा मोठ्या प्रमाणात पादचारी वर्दळ असलेल्या ठिकाणी परिस्थितीनुसार पादचारी उड्डाणपूल (Sky Bridge), सुरक्षित पादचारी मार्ग, पादचारी क्रॉसिंग आणि सौर चेतावणी दिवे उभारण्याचा तांत्रिकदृष्ट्या विचार करावा.
तसेच शहराच्या प्रवेशमार्गावर योग्य ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र, स्वच्छ, सुरक्षित आणि नियमित देखभाल होणारे स्वच्छतागृह उभारण्याचाही विचार करावा. बाहेरून येणारे पर्यटक, महिला प्रवासी आणि कुटुंबांसाठी ही मूलभूत सुविधा ठरेल.
सातारा शहराच्या प्रवेशमार्गाला ऐतिहासिक ओळखीला साजेसे नियोजन हवे
जुना आरटीओ चौक ते वाढेफाटा हा सातारा शहराचा महत्त्वाचा प्रवेशमार्ग आहे. पुणे, मुंबई तसेच राज्यातील विविध भागांतून साताऱ्यात येणारे नागरिक आणि पर्यटक या मार्गाने शहरात प्रवेश करतात.
सातारा हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून शहराच्या विकासाला चालना मिळाली. त्यामुळे शहराच्या प्रवेशमार्गाचे नियोजनही साताऱ्याच्या ऐतिहासिक ओळखीला साजेसे, सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक असणे गरजेचे आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अपघातप्रवण ठिकाणी चेतावणी फलक, सौर दिवे, रम्बलर, रस्त्यावरील परावर्तित स्टड, दिशादर्शक आणि इतर सुरक्षा उपायांचा वापर केला जातो. अशा उपाययोजनांची आवश्यकता व ठिकाणे तांत्रिक पाहणीच्या आधारे निश्चित करणे महत्त्वाचे आहे.
संयुक्त तांत्रिक पाहणी करून नागरिकांना सुरक्षित पर्याय द्यावा
जुना आरटीओ चौक ते वाढेफाटा या मार्गाची संबंधित रस्ते विभाग, वाहतूक पोलीस आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाकडून तातडीने पाहणी करण्यात यावी. २२ पैकी प्रत्येक रम्बलर कोणत्या कारणासाठी बसविण्यात आला, त्यामागील तांत्रिक निकष काय आहेत, याची तपासणी करावी.
आवश्यकता नसलेले रम्बलर हटवून त्याऐवजी योग्य ठिकाणी आधुनिक रस्ता सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात. आवश्यक ठिकाणी रम्बलर ठेवतानाच त्यापूर्वी स्पष्ट चेतावणी फलक, सौर ब्लिंकर, रिफ्लेक्टिव्ह रोड स्टड आणि इतर सुरक्षितता उपाय उपलब्ध करून द्यावेत.
“ही मागणी कोणत्याही रस्ता सुरक्षा उपायाला विरोध करण्यासाठी नाही. नागरिकांकडून आलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर दीड किलोमीटरमध्ये २२ रम्बलरची आवश्यकता आणि त्यांची ठिकाणे तांत्रिकदृष्ट्या तपासली जावीत, एवढीच अपेक्षा आहे. अनावश्यक रम्बलर काढून त्याऐवजी चालकाला आधीच सावध करणाऱ्या आधुनिक सुरक्षा उपाययोजना केल्यास नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवास मिळू शकतो. संबंधित विभागाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी; अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल,” अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी व्यक्त केली.











Leave a Reply