मुंबई – १९९५ पासून आमच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जात होत्या. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आता एकच निवडणूक लढवली आहे. त्यामुळे कोणती यादी पाठवली जाते, कोणती डावलली जाते हे आम्हाला पक्क माहिती आहे अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसेंनी भाजपाच्या राज्य नेतृत्वावर टीकास्त्र सोडलं. यावेळी ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचं कामकाज सुरु असताना मला अँन्टी चेंबरमध्ये बोलावलं, तिथे मी गेलो, आम्ही दोघचं होतं, त्यावेळी राज्यपालपदासाठी मी तुमचं नाव पाठवतोय असं चेंबरमध्ये बोलणं झालं. माझ्या एकलुत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो असंही फडणवीस म्हणाले, त्यांनी प्रयत्न केले असतील पण झालं नाही. राज्यसभेच्या वेळीही माझं नाव सुचवणार असं सांगितले पण त्यानंतरही नाव वरिष्ठांना नाकारलं असं सांगितले. विधान परिषदेसाठीही नाव पाठवलं, जी नावे दिली ती वगळून दुसरी ४ नावं आली. त्यावेळी मी म्हटलं जमत असेल तर करा, उगाच खोट्या अपेक्षा दाखवू नका, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पाठवलेल्या यादीला संमती देत नाही म्हणजे कुठेतरी गडबड वाटते, कारण आमच्यावेळी वेगळं होतं, जी नावे आम्ही दिल्लीला पाठवत होतो त्यांना संमती मिळत होती असं ते म्हणाले.
त्याचसोबत माझ्याकडे अनेक व्हिडीओ, कागदपत्रे आहेत ती समोर आली तर धक्का बसेल, मी इतक्या खालची पातळीचं राजकारण करत नाही, वरिष्ठांना ते दाखवलं आहे. त्यांच्यासारखं मी चुका केल्या नाहीत, या व्यक्तिगत बाबी आहेत, मी पक्षाच्या वरिष्ठांसमोर हे मांडले आहे. वरिष्ठांकडून न्याय मिळाला नाही तर जनतेसमोर मांडेन.काहींच्या जीवनात बदल घडू शकतो. ज्यांच्यामुळे मला त्रास झाला त्यांच्याबद्दल दया असण्याचं कारण नाही. जे काही होईल जनतेसमोर येईल असा इशाराही एकनाथ खडसे यांनी केला आहे.













Leave a Reply