सातारा प्रतिनिधी :
सातारा-लोणंद मार्गावरील वाढे येथील ऐतिहासिक पुलाच्या धोकादायक अवस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ते मदन भिमाजी साबळे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मा. कदम साहेब यांना निवेदन दिल्यानंतर अवघ्या काही तासांत संबंधित कामाला गती मिळाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
पुलाच्या कमानीला पडलेल्या भेगा, पुलाखाली वाढलेली वडाची झाडे तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा बंद झाल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. याबाबत वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. या गंभीर विषयाला प्रसारमाध्यमांनीही योग्य प्रकारे वाचा फोडली होती. विशेषतः लोकवृत्त चॅनलने या प्रश्नावर सातत्याने बातम्या प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याबद्दल मदन साबळे यांनी लोकवृत्त चॅनलचेही आभार व्यक्त केले आहेत.
निवेदनानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याने “अधिकारी इच्छाशक्ती दाखवली तर कामे वेगाने होऊ शकतात,” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
याबाबत बोलताना मदन साबळे म्हणाले,
“आम्ही कोणालाही विनाकारण त्रास देण्यासाठी आवाज उठवत नाही. अपघात होऊ नयेत, प्रशासनावर अचानक ताण येऊ नये आणि जनतेची सुरक्षितता कायम राहावी, यासाठी धोक्याच्या बाबी वेळेवर लक्षात आणून देणे हे माझे कर्तव्य आहे.”
दरम्यान, आता फक्त एक महत्त्वाचे काम बाकी असून वाढे आणि वडूथ पुलावरील रस्त्याची वाढलेली उंची कमी करून पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी असलेले ‘रेन वॉटर होल’ तातडीने मोकळे करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
सातारा-लोणंद हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून या रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागासोबतच जिल्हा प्रशासनानेही या विषयात समन्वय साधून आवश्यक ती मदत करणे गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी उर्वरित कामे पूर्ण झाल्यास नागरिक, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच रोज प्रवास करणारे हजारो नागरिक निर्धास्त राहू शकतील.
स्थानिकांच्या मते, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण झाल्यास पुलामध्ये पाणी मुरण्याचा धोका कमी होईल, वाहतूक अधिक सुरक्षित बनेल आणि भविष्यातील संभाव्य अपघातही टळतील. त्यामुळे प्रशासनाने उर्वरित कामही तातडीने पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












Leave a Reply