IMG_1344ऐतिहासिक मार्गावरील वृक्षतोडीने नागरिक संतप्त
झाडे तोडली, हलवली की विकली? चौकशीची मागणी
सातारा प्रतिनिधी :
शिरवळ ते वाढे फाटा परिसरातील ९६५डि राष्ट्रीय महामार्गालगत झालेल्या कथित बेकायदेशीर वृक्षतोडीप्रकरणी प्रशासनाविरोधात आता नागरिकांचा संताप उफाळून येऊ लागला आहे. वारंवार लेखी निवेदन देऊनही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने “वन विभाग नेमका गप्प का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
भाजप युवा मोर्चाचे जिल्हासचिव मदन भिमाजी साबळे यांनी महाराष्ट्र वन विभागाला पुन्हा एकदा कठोर निवेदन देत संबंधित कंत्राटदार, उपकंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यालगतची अनेक जुनी, विशाल आणि ऐतिहासिक महत्त्व असलेली झाडे मोठ्या प्रमाणावर तोडण्यात आली आहेत. काही झाडे दुसरीकडे हलविण्यात आली, तर काही झाडांची विक्री झाल्याच्याही चर्चा परिसरात रंगू लागल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रकाराबाबत संशय अधिक गडद झाला आहे.
विशेष म्हणजे, हा मार्ग छत्रपतींच्या इतिहासाशी जोडलेला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. सुमारे ३०० वर्षांपूर्वीच्या काळातील अनेक वृक्ष या मार्गावर आजही अस्तित्वात होते. त्यामुळे ही केवळ वृक्षतोड नसून ऐतिहासिक वारशावर घाला असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
“आमच्या खासगी मालकीच्या जागेतील झाडे कोणालाही न विचारता कशी नेली जातात? ही झाडे आमच्या पूर्वजांनी कष्टाने जपलेली आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अभिनेते सयाजी शिंदे यांच्या माध्यमातून राज्यभर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड मोहिमा राबवल्या जात आहेत. त्या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असतानाच शिरवळ ते वाढे फाटा या मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून हरित पट्टा निर्माण करण्याची मागणीही पुढे आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात वन विभागाच्या भूमिकेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून लेखी तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संशय आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मदन साबळे यांनी दिला आहे.












Leave a Reply