१८१ वर्षांचा ऐतिहासिक वाढे दगडी पूल धोक्याच्या उंबरठ्यावर; प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतंय का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IMG_1356सातारा-लोणंद मार्गावरील वाढे येथील तब्बल १८१ वर्ष जुना ऐतिहासिक दगडी पूल आज अक्षरशः मृत्यूच्या दारात उभा आहे. पुलाच्या मुख्य कमानीला मोठी भेग पडली असून पुलाच्या खालच्या बाजूस उगवलेल्या वडाच्या झाडांच्या मुळांनी संपूर्ण दगडी रचना आतून पोखरण्यास सुरुवात केली आहे. पुलाची अवस्था इतकी गंभीर बनली आहे की कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

छत्रपती मानमहाराज शाहाजीराजे भोसले यांच्या काळात बांधण्यात आलेला हा पूल त्या काळातील अद्वितीय स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. विशेष म्हणजे १८१ वर्षांपूर्वीही सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पुलावर पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पायवाट तयार करण्यात आली होती. त्या काळातील दूरदृष्टी आणि नियोजन आजही या पुलातून दिसून येते. मात्र आज संबंधित विभागाच्या गंभीर निष्काळजीपणामुळे हा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

काही जण या पुलाला “ब्रिटिशकालीन पूल” म्हणून संबोधत असले तरी इतिहास अभ्यासकांच्या मते हा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ऐतिहासिक मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावरील पूल, दगडी बांधकामे आणि रचना या मराठा स्थापत्य परंपरेच्या जिवंत साक्षी आहेत. त्यामुळे चुकीची माहिती पसरवण्यापेक्षा इतिहासाचा सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर सन २०२४ मध्ये वडूथ येथील या पुलाला हेरिटेज दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे हा पूल केवळ वाहतुकीचा मार्ग नसून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे आज हा वारसा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे धोक्यात आला आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आजपर्यंत कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याने पुलाखाली उतरून प्रत्यक्ष पाहणी केलेली नाही. केवळ कागदोपत्री अहवाल, बैठका आणि आश्वासनांच्या आधारे प्रशासन सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहे का, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार, दुचाकीस्वार, रुग्णवाहिका आणि प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. पावसाळ्यात पुलावर मोठमोठे खड्डे पडलेले असतानाही त्याच पुलावरून वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे पुलावर आवश्यकतेपेक्षा जास्त उंचीचा डांबराचा थर टाकण्यात आल्याने पुलावर अतिरिक्त भार निर्माण झाला आहे. आधीच कमकुवत झालेल्या या ऐतिहासिक पुलावर हा अतिरिक्त भार अधिक धोकादायक ठरत असून पुलाच्या मूळ रचनेवर सतत ताण पडत आहे. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालली आहे.

यापूर्वी अनेक वेळा संबंधित विभागाला पुलावरील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची छिद्रे साफ करण्याबाबत लेखी निवेदने देण्यात आली होती. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आजही पावसाचे पाणी पुलाच्या दगडी संरचनेत मुरत आहे. परिणामी पुलाची आतील बांधणी अधिक कमकुवत होत चालली आहे. विशेष म्हणजे पुलावरील निचऱ्याची छिद्रे पूर्णपणे बंद झाली असून ती आता दिसेनाशी झाली आहेत. ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.

यापूर्वी पुलावरील अतिरिक्त भार कमी करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा पुलावर जास्त उंचीचा डांबराचा थर टाकून अतिरिक्त भार निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे पुलाची पुन्हा पूर्वीसारखीच भीषण अवस्था निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या पुलावर तब्बल दोन फूटांपर्यंत पाणी साचते. वाहतूक कोंडीमुळे एकाच वेळी असंख्य वाहने पुलावर उभी राहतात आणि सतत एकसमान भार पुलावर पडत राहतो. त्यामुळे सावित्री नदीवरील दुर्घटनेसारखा मोठा अनर्थ येथे घडण्याची भीती आता ग्रामस्थांमध्ये तीव्र झाली आहे.

वाढे, वडूथ, आरळे, शिवथर आणि आरफळ ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा प्रशासनाला निवेदने देऊन इशारे दिले होते. मात्र संबंधित विभागाने केवळ वेळकाढूपणा करत नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भविष्यात या पुलावर कोणताही अपघात, जीवितहानी किंवा मोठा अनर्थ घडल्यास त्यास जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार सर्वस्वी जबाबदार राहतील, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच अशा वेळी संबंधितांवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तीव्र मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांची प्रशासनाला शेवटची आर्त विनंती आहे — दुर्घटना घडण्याची वाट पाहू नका. तात्काळ पुलाची उच्चस्तरीय तांत्रिक तपासणी करा, पुलाखालील वडाची झाडे हटवा, पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची छिद्रे त्वरित मोकळी करा, अतिरिक्त डांबरी भार कमी करा, अवजड वाहतूक नियंत्रित करा आणि दर्जेदार दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू करा. अन्यथा एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *