महामार्गाच्या नावाखाली हिरवळीचा बळी?; हद्दीबाहेरील वृक्षतोडीवर संताप, चौकशीची मागणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा, प्रतिनिधी : शिरवळ-लोणंद-सातारा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डीच्या रुंदीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असताना, नियमांच्या चौकटीबाहेर जाऊन मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. विशेषतः शिवथर ते वाढे फाटा या परिसरात रस्त्याच्या हद्दीबाहेरील जुनी व मोठी झाडे तोडण्यात आल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी या प्रकाराची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

महामार्गाच्या कामासाठी अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या तोडीस वन विभागाची परवानगी घेण्यात आली होती. मात्र, नियमानुसार केवळ रस्त्याच्या आणि गटाराच्या हद्दीतील झाडेच तोडण्यास परवानगी असताना प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हद्दीबाहेरील आणि कोणताही अडथळा न ठरणारी झाडेही कापण्यात आल्याचा आरोप होत आहे. काही ठिकाणी शेकडो वर्षे जुनी सावलीची झाडे जमीनदोस्त करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या प्रकल्पासाठी मुख्य ठेकेदाराने शिरवळ ते सातारा या टप्प्यात सात पोटठेकेदार नेमले असून, शिवथर ते वाढे फाटा या भागातील काम दामूगडे नावाच्या ठेकेदारामार्फत सुरू आहे. याच भागात सर्वाधिक नियमबाह्य वृक्षतोड झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, संबंधित ठेकेदाराकडे याबाबत विचारणा केली असता “तोडण्यात आलेल्या झाडांचे पुनर्जीवन करण्यात येणार आहे,” असे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र, आधी शेकडो वर्षे जुनी झाडे तोडायची आणि नंतर पुनर्लागवडीच्या घोषणा करायच्या, हा पर्यावरणाशी खेळ असल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

नियमांनुसार एका झाडाच्या बदल्यात किमान पाच झाडे लावणे बंधनकारक असते. तसेच त्या झाडांचे पुढील तीन वर्षे संगोपन आणि देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असते. मात्र, अनेक ठिकाणी पुनर्लागवड केल्यानंतर झाडांची योग्य देखभाल होत नसल्याचे वास्तव असल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या संपूर्ण प्रकारात केवळ ठेकेदारच नव्हे तर संबंधित विभागाचे अधिकारीही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. काम सुरू असताना अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून देखरेख करणे अपेक्षित असते. मात्र, परवानगी दिल्यानंतर अधिकारी घटनास्थळी फिरकत नसल्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याची नाराजी स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

रस्त्याच्या कामासाठी आवश्यकतेपलीकडे झालेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून शेतकऱ्यांचेही नुकसान झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे वन विभागाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *