सातारा–लोणंद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आरळे गावाजवळ ट्रक बंद पडल्याने दोन तास ठप्प वाहतूक – तालुका पोलिसांचा तत्पर प्रतिसाद

शिवथर :
सातारा–लोणंद हा तालुक्यातील प्रमुख आणि व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मार्ग सोमवारी संध्याकाळी पूर्णपणे ठप्प झाला. आरळे गावाजवळ एक मालवाहू ट्रक अचानक बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. रस्त्याची अरुंद रुंदी आणि दोन्ही बाजूंनी वाढलेली वाहनांची गर्दी यामुळे दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तब्बल दोन तासांहून अधिक काळ वाहनचालक आणि प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत थांबावे लागले.

संध्याकाळी सुमारे सातच्या सुमारास लोणंदकडून साताऱ्याकडे येणारा मालट्रक बंद पडला. परिणामी साताऱ्याकडून येणारी वाहतूक पाटखळ माथा येथे, तर लोणंदकडून येणारी वाहतूक वडूथ गावापर्यंत थांबली होती. दुचाकी, चारचाकी, एस.टी. बस व ट्रक यांच्या रांगा वाढत राहिल्याने प्रवाशांचा संताप उसळला.

घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर सुरू केला. लोणंदकडे जाणारी वाहतूक लिंब–शिवथर मार्गे, तर साताऱ्याकडे जाणारी वाहतूक वडूथ–बोरखळ–सोनगाव–क्षेत्रमाहुली मार्गे वळवण्यात आली. पोलिसांच्या तातडीच्या आणि संयमी कारवाईमुळे अखेर सुमारे दोन तासांनंतर वाहतूक पूर्ववत झाली.

या घटनेमुळे प्रवाशांमध्ये व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले. रस्त्याची मर्यादित रुंदी, चुकीची वाहनतळ व्यवस्था आणि सतत वाढत असलेली भारी वाहनांची रहदारी यामुळे या मार्गावर वारंवार कोंडी निर्माण होते. नागरिकांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे सातारा जिल्हा सचिव मदन भीमाजी साबळे यांनी प्रशासनाला कठोर इशारा देत म्हटले की

सातारा जिल्हाधिकारी यांनी या मार्गाची विशेष पाहणी करून या मार्गावरील अवजड वाहतूक तात्पुरते बंद करून, काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गे वळवावी, ही जनतेच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक मागणी आहे.
हा मार्ग लोकजीवनासाठी धोकादायक बनला असून, नागरिक दररोज त्रास सहन करत आहेत.
प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही सर्व गावकऱ्यांना घेऊन व्यापक आंदोलन उभारू.
जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *