सातारा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण…अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय साजरा करणारा पर्व. याच सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीच्या तेजाने यमगर कुटुंबावरील अंधार दूर झाला आणि त्यांच्या घराचा “दिवा” पुन्हा प्रकाशमान झाला.
सर्जेराव यमगर यांचा मुलगा दत्ता यमगर हा दिनांक १४ ऑक्टोबरपासून घरातून निघून गेला होता. बराच शोध घेऊनही तो सापडत नसल्याने यमगर कुटुंब अंधकारमय संकटात सापडले होते. यासंदर्भात सर्जेराव यमगर यांनी वडूज पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती.
रविवारी रात्री सुमारास ११ ते १२ च्या दरम्यान मर्ढे गावात एक अनोळखी युवक फिरत असल्याने गावात गोंधळ निर्माण झाला. अंधारामुळे तो नीट ओळखता येत नव्हता. काही महिलांनी आणि युवकांनी त्या अनोळखी व्यक्तीस ताब्यात घेतले.
गावचे पोलीस पाटील महेश रोकडे यांनी तत्काळ ही माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक नीलेश तांबे यांना दिली. पो.नि. तांबे यांनी तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) मोरडे यांना घटनास्थळी जाऊन आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
त्या वेळी सपोनि मोरडे हे बोरगाव पोलिस ठाण्यात तपासासाठी गेले होते. त्यांनी अवघ्या ३० मिनिटांत मर्ढे गाव गाठले आणि गावकऱ्यांच्या मदतीने तुषार शिंगटे, अक्षय शिंगटे यांच्या सहकार्याने सदर युवकास पोलिस ठाण्यात आणले.
ठाणे अंमलदार वायदंडे यांनी त्या युवकास खाण्यासाठी खाऊ आणि पाणी दिले. आपुलकीने चौकशी केली असता त्या युवकाने आपले नाव दत्ता यमगर, तसेच वडील, आई आणि बहिणीची नावे सांगितली. तत्काळ वायदंडे यांनी वडूज पोलिस ठाण्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, संबंधित युवकाच्या हरवल्याची तक्रार नोंद असल्याचे स्पष्ट झाले.
रात्री उशिराच यमगर कुटुंबीयांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. सपोनि मोरडे आणि ठाणे अंमलदार वायदंडे यांनी अत्यंत संवेदनशीलतेने दत्ता यमगर याला त्यांच्या कुटुंबाकडे सुखरूप सुपूर्द केले.
पोलिसांच्या माणुसकीचे कौतुक
सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि. नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मोरडे, ठाणे अंमलदार वायदंडे, पोलीस पाटील महेश रोकडे, तुषार शिंगटे आणि अक्षय शिंगटे व ग्रामस्थ मर्ढे यांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी यामुळे यमगर कुटुंबाला त्यांच्या मुलाचा शोध लागला. या घटनेने सातारा तालुक्यातील नागरिकांकडून पोलिसांचे मनःपूर्वक कौतुक होत आहे.












Leave a Reply