सातारा
महाराष्ट्रातील गावांचा विकास नव्या युगात
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या पुढाकाराने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राज्यभरात उत्साहात सुरू झाले आहे. दि.१७ सप्टेंबर पासून दि. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत हा अभियान लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राबवला जात आहे. अभियानाचे उद्दिष्ट गावांमध्ये सुशासन, पारदर्शक प्रशासन, पर्यावरण संवर्धन, जल व्यवस्थापन, महिला व युवक सक्षमीकरण, मनरेगा सारख्या योजनांचा लाभ आणि सामाजिक न्याय या सात ठळक घटकांवर केंद्रित आहेत. ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या प्रभावी सहभागातून रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण, शाश्वत शेती प्रकल्प, संस्थांची बळकटी, आणि स्थानिक रोजगार निर्मिती यांत मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे या अभियानात होणारी स्पर्धा १०० गुणांची असून १०० पैकी पैकीच्या पैकी गुण मिळविण्यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात सर्वोत्तम कामगिरी करण्याची धडपड सुरू आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी झालेल्या प्रत्येक गावात श्रमदान , लोकसहभागातून विकासाची चळवळ निर्माण होऊ लागली आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध शासकीय योजना जलदगतीने राबविल्या जात आहेत. सक्षम आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर पुरस्कार दिले जाणार असून, गावांच्या विकास कार्यांना मोठा निधी मिळणार आहे.
अभियानासाठी राज्याने तब्बल रु. २९०.३३ कोटींची तरतूद केली असून त्यापैकी रु.२४५.२० कोटी पुरस्कारांसाठी ठरविण्यात आले आहेत. ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ केवळ स्पर्धा नव्हे, तर गावांचा चेहरामोहरा बदलणारी लोकचळवळ ठरणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर केले आहे. तर यात प्रत्येक गावाने सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आवाहन केले आहे.
या अभिमान्य उपक्रमात प्रत्येक ग्रामस्थाने सहभाग घेतल्यास शाश्वत आणि आत्मनिर्भर गावाची वाटचाल सुनिश्चित होईल. प्रत्येक तालुक्यातील १५ ते २० गावात जय्यत तयारीनिशी मुल्यांकनात गुणांकन मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.त्यामुळे हे अभियान आता लोकांनी गावाचा सर्वांगीण विकासाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी उत्साहात सहभाग आणि प्रयत्न केले जात असल्याचे चित्र सातारा जिल्ह्यात गावोगावी दिसून येते.












Leave a Reply