सातारा – प्रतिनिधी
सातारा–लोणंद मार्गावरील वडूथ व वाढे येथील नदीवरील १८० वर्ष जुने ऐतिहासिक पूल आज अक्षरशः धोक्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. कृष्णा नदीवरील दगडी पूल वास्तुशास्त्राचे वारसास्थान असले तरी, पुलावर पडलेले प्रचंड खड्डे, वाढलेली झाडे आणि संरक्षण भिंतीचा अभाव यामुळे पुल कोसळण्याचा धोका टाळता येणार नाही, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यात अवजड वाहतूक सुरूच ठेवली गेल्याने या पुलाचा जीव धोक्यात घातला जातोय, असा थेट आरोप करण्यात आला.
“पूल पडून जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? कितीही निवेदनं दिली तरी अधिकाऱ्यांना जनतेचे दु:ख दिसत नाही. ते फक्त एसी गाड्यांत बसून फिरतात. पण आता आम्ही गप्प बसणार नाही. अवजड वाहतूक त्वरित बंद झाली नाही, दुरुस्ती झाली नाही तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र रास्ता रोको करतील आणि त्यातून उद्भवणाऱ्या गोंधळ, अपघाताची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनावरच असेल,” असा आक्रमक इशारा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आणि उदयनराजे मित्र समूहाचे वडूथ अध्यक्ष मदन साबळे यांनी दिला.
गावकऱ्यांचा रोष इतका तीव्र झाला आहे की, “आमची सहनशक्ती संपली आहे, यापुढे काही अनुचित घडल्यास शासनाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.
यापूर्वी वडूथ, वाढे, आरळे, शिवथर, आरफळ या गावांनी अनेकदा निवेदनं देऊन पुलांची दुरुस्ती, वाहतूक बंदीची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे वडूथ, वाढे ग्रामस्थांमध्ये आता प्रचंड संताप असून “कारवाई करा नाहीतर आंदोलन ठरलेलंच” असा अंतिम इशारा देण्यात आला आहे.












Leave a Reply