शिवथर
सातारा–लोणंद रस्त्यावरील वाढे फाट्याजवळील मोडावर प्रचंड खोल खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. जीवघेणे अपघात घडण्याआधीच प्रशासनाने तातडीने दखल घेणे अपेक्षित असताना, संबंधित विभाग मात्र गांधारीच्या भूमिकेत वागत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. खोल खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात, त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची टक्कर होऊन गंभीर अपघात होण्याचा धोका वाढला आहे. अनेकांनी स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार तक्रारी करूनही केवळ “या रस्त्याचा आमच्याशी काही संबंध नाही” असा पवित्रा घेतला जात असल्याने नागरिकांत संतापाची लाट आहे.
वाहनचालक आणि ग्रामस्थांच्या मते —
“अधिकारी व ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे हा रस्ता मरणरस्ता झाला आहे. अपघात घडल्यावरच यावर पावले उचलली जातात, तोवर एखाद्या कुटुंबाचे सर्वस्व हिरावलेले असते”
हॉटेल व्यवसायिकांचा आरोप —
वाठे फाटा परिसरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी रस्त्यावर अनधिकृत अतिक्रमणे केल्याने मोठ्या वाहनांना वळण घेणे कठीण झाले आहे. या अतिक्रमणांमुळेही अपघातांचे प्रमाण वाढले असून, पोलिस व प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप करण्यात येतो.
सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी तातडीने दखल घेऊन —
रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत,
अतिक्रमणे त्वरित हटवावीत,
आणि अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात,
अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा संतप्त नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.












Leave a Reply