सातारा
जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यास सुरुवात केली असून जिल्ह्यात खते, बि-बियाणे आणि औषधे यांची विक्री देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. अशातच काही दुकानदार शेतकऱ्यांची फसवणूक करून बनावट खते, बि-बियाणे, औषधे विक्री करीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कृषी आणि अन्न व औषध विभागाने अशा दुकानदारांवर अचानक धाडी टाकाव्यात तसेच प्रत्येक तालुका स्तरावर शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण केंद्र उभारावे अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी केली आहे.
शेतकरी दरवर्षी विविध नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे अगोदरच बेजार होतो अशामध्येच वर्षांची उपजिविका तसेच मुलांचे शिक्षण व आरोग्य यासाठी मोठ्या अपेक्षेने पेरणी करत असतो. पेरणीसाठी लाखो रुपये खर्च करून आणि पुढे पीक चांगले यावे यासाठी रात्रंदिवस राबत असतो. मात्र काही नतद्रष्ट दुकानदार शेतकऱ्यांना बनावट खते, बियाणे, औषधे विक्री करत असल्याचे वारंवार समोर आले आहे. अशा दुकानदार यांच्यावर कधी ही कृषी अथवा अन्न व औषध प्रशासनाने स्वतः हून धाडी टाकल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे अशा दुकानदारांचे अधिक फावल्याचे दिसून येते. वास्तविक पेरणी करून पीक चांगले येत नसेल तर शेतकरी नैराश्याच्या भावनेत जातो आणि पुढे टोकाचे पाऊल देखील उचलतो. एकूणच पिकाची पेरणी केल्यापासून ते विक्री पर्यंत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. तेव्हा किमान पेरणी करण्याच्या पहिल्या टप्प्यावरच शेतकऱ्याची होणारी फसवणूक रोखण्यासाठी कृषी आणि अन्न व औषध प्रशासनाने कठोर पावले उचलून धाडसत्र राबवावे अन्यथा रयत क्रांती संघटना स्वतः ते धाडसत्र राबवणार असल्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.












Leave a Reply