सातारा : ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आणि गड-किल्ल्यांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने सारथी किल्ले गड संवर्धन उपक्रम २०२५ अंतर्गत, सातारा तालुक्यातील सारथी संगणक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या वतीने वतीने किल्ले अजिंक्यतारा येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सातारा तालुक्यातील सारथी उपक्रमांतर्गत संगणक शिक्षण घेणाऱ्या मराठा व कुणबी मराठा समाजातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था) हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून, मराठा आणि कुणबी मराठा समाजातील युवकांना शिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण दिले जात असून सातारा तालुक्यातील हजारो विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.
स्वच्छता मोहिमेच्या प्रारंभी सकाळी आठ वाजता सर्व विद्यार्थी स्वयंसेवक किल्ले अजिंक्यताराच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र आले. यावेळी अमर कॉम्प्युटर च्या विद्यार्थ्यांनी दांडपट्टा, लेझीम यासारख्या पारंपरिक कौशल्यांचे प्रदर्शन केले. तसेच, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत साकारलेल्या कुमारी स्वराली राहुल ताटे व चिरंजीव अथर्व अमर जाधव यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
गडावरील प्लास्टिक, कचरा, काचेच्या आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि अन्य कचऱ्याच्या तब्बल ४० हुन अधिक कचऱ्याची पोती गोळा करून सोनगाव येथील कचरा डेपो मध्ये पाठवण्यात आली. यावेळी अमर कॉम्प्युटर कोडोली चे संस्थाचालक श्री अमर जाधव म्हणाले की, ऐतिहासिक वारसा सांभाळण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून किल्ले आणि गड संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी सर्वांनी आपापल्या परीने सहकार्य करणे गरजेचे आहे आणि गड किल्ले हीच आपली संस्कृती असून याच्या माध्यमातूनही आपण या थोर महात्म्यांना अशा कामातून अभिवादन देऊ शकतो, त्याचबरोबर ऐतिहासिक वारसास्थळ जोपासण्याची प्रत्येकाची गरज असल्याचे सांगितले. या उपक्रमात अमर कॉम्प्युटर (कोडोली), स्वराली कॉम्प्युटर (तासगाव), आदर्श कॉम्प्युटर (सातारा), बालाजी कॉम्प्युटर (विलासपूर), अनिल कॉम्प्युटर (सैदापूर), साईप्रसाद कॉम्प्युटर, सह्याद्री कॉम्प्युटर, महालक्ष्मी कॉम्प्युटर, स्नेहल कॉम्प्युटर, साई शुभम कॉम्प्युटर, अक्षय कॉम्प्युटर, आयटीसीटी कॉम्प्युटर, ज्ञानदीप कॉम्प्युटर इत्यादी संस्थांमधील सारथी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या उपक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी सारथी प्रशिक्षण संस्था सातारा सर्व संस्थाचालक यांनी विशेष मेहनत घेतली. भविष्यात अशा उपक्रमांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. गड-किल्ल्यांचे जतन आणि स्वच्छ भारत अभियानास हातभार लावण्यासाठी अशा मोहिमा महत्त्वाच्या आहेत. सातारा जिल्ह्यातील हा उपक्रम गड संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, भविष्यात अशा मोहिमा नियमितपणे राबवण्याचा संकल्प करण्यात आला.












Leave a Reply