वाहन चालवताना नियमांचे पालन करा
– विनोद चव्हाण
सातारा
घाई गर्दीची मानसिकता अपघातास कारणीभूत ठरते ती का निर्माण होते याचा सखोल अभ्यास करण्याची गरज असून रस्ते वाहतुकीच्या नियमांची केवळ माहिती नको म्हणून रस्ते वाहतुकीची केवळ माहिती न घेता ते नियम आचरणात आणावेत असे आवाहन सातारा जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले.
सविस्तर वृत्त असे पाचवड ता.वाई याठिकाणी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ३५ वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत,रस्ता सुरक्षा प्रबोधन व प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विनोद चव्हाण बोलत होते.या प्रसंगी अभिनेते मधुकर खरे, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.डॉ.मंजुश्री बोबडे आणि प्राध्यापक उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना सातारा जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी वाहतुकीचे नियम का पाळले पाहिजेत याचे सखोल मार्गदर्शन करताना सांगितले की आपले जीवन एकदाच आहे ते वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे नाहक अपघात होऊन व्यर्थ घालवू नका. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वतः वाहतुकीचे नियम पाळून त्या नियमांचे महत्त्व स्वतःच्या कुटुंबातील सर्वच लोकांना पटवून देण्याची गरज आहे.आपण परदेशात गेलो की त्या देशातील सर्वच नियम काटेकोरपणे पाळत असतो मग आपल्याच देशातील वाहतुकीचे नियम पाळणे हे आपले कर्तव्यच आहे.भारतामध्ये रस्ते अपघातात सर्वात जास्त बळी जात असतात.त्यामुळेच चारचाकी गाडी चालकांनी वेगाची मर्यादा ठेवली पाहिजे तर दुचाकी वाहन धारकांनी हेल्मेटचा वापर करून मर्यादित वेग ठेवूनच स्वतःचे वाहन चालवले पाहिजे. घाईगर्दीची मानसिकता अपघातास कारणीभूत असून ती का निर्माण होते व ती टाळण्यासाठी काय करावे याचे सखोल विवेचन केले. केवळ माहिती नको संस्कार हवेत या उक्तीप्रमाणे नियमांची माहिती आचरणात आणण्यासाठी आवाहन केले.
या प्रसंगी अभिनेते मधुकर खरे म्हणाले की माझा स्वतः दुचाकी वाहन चालवताना खूप मोठा अपघात झाला होता. दुर्दैवाने मी त्यावेळी हेल्मेट न घातल्याने मला प्रचंड मोठी दुखापत झाल्याने तब्बल सहा महिने एका जागेवर काढावे लागले होते.त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे हे मला चांगलेच माहीत आहे.पुढे बोलताना मधुकर खरे म्हणाले की याच वयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवायच असतं. ही पाच वर्ष मनापासून अभ्यास केला तर पुढील संपूर्ण आयुष्य सुखात व्यतीत करता येईल.
प्राचार्य डॉ.मंजुश्री बोबडे म्हणाल्या आमचे विद्यार्थी आजूबाजूच्या अनेक खेडेगावातून येत असतात.मागील १० वर्षात आमच्या महाविद्यालयाचा निकाल हा अतिशय समाधानकारक आहे याचे सर्व श्रेय आमच्या तज्ञ शिक्षकांना जाते.इथले सर्वच विद्यार्थी सुध्हा अतिशय समंजस आणि कष्टाळू आहेत.मी स्वतःला या प्रत्येक विद्यार्थ्याची आई समजून या विद्यार्थ्यांना घडविण्याचे प्रयत्न करीत असते.
प्रास्ताविक व स्वागत प्रा.किशोर गाढवे यांनी केले. या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे माजी सदस्य,संस्थेचे देणगीदार प्रा.डॉ. प्रकाश गायकवाड,उपप्राचार्य डॉ. भारत खिल्लारी, प्रा.अनिल कोकाटे, महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.












Leave a Reply