श्री शिवराज्याभिषेक भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन.- *खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

श्री शिवराज्याभिषेक भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ही भारताच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना मानली जाते. ६ जून १६७४ साली महाराजांनी केलेल्या विधियुक्त राज्याभिषेकाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. या राज्याभिषेकामुळे महाराजांनी स्थापन केलेल्या राज्यास कायदेशीर बैठक प्राप्त झाली. राज्यभिषेकाच्या माध्यमातून महाराजांनी जुलमी राजवटी उलथवून टाकून नवं स्वराज्य स्थापन केले. त्यांचे हे कार्य असामान्य स्वरूपाचे होते. राज्याभिषेक ही संपूर्ण देशात लोकशाही राज्याची संकल्पना साकारणारी घटना होती. महाराजांनी वयाच्या १५ व्या वर्षी स्वराज्याचा विचार करून तो प्रत्यक्षात साकारणे हे एक अलौकिक कार्य होते. त्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन झाली, असं आपण मानतो. त्यामुळेच पावणे चारशे वर्षे झाली तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वत्र अधिराज्य करीत आहे. कारण महाराजांनी जे राज्य उभं केलं ते रयतेसाठीच…

मोगल,आदिलशाही अशा परकिय सत्ता ची शेकडो वर्षाची जुलमी राजवट संपुष्टात आणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. आपल्या राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा संघर्ष होता. शिवाजी महाराजांच्या राज्यातत महिलांना संरक्षणाबरोबरच सन्मानाची वागणूक मिळत होती. मॉं जिजाऊसाहेबांच्या शिकवणीतून महाराजानां सतत प्रेरणा मिळायची.
या राज्याभिषेकानंतर अनेक घडामोडी घडत होत्या. खरं तर कायद्याच राज्यात ज्या ज्या सुधारणा आवश्यक असतात त्या त्या सुधारणा महाराजांनी प्रत्यक्षात साकरण्यास सुरूवात केली. अनेक बारीक सारीक गोष्टींचा विचार महाराजांनी प्रत्यक्षात आणला. त्या काळात फार्सी भाषेचा प्रभाव वाढलेला होता. त्यामुळे मराठी भाषा मागे पडण्याचे भीती होती. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या भाषेचा प्रभाव काढून टाकण्यासाठी फार्सी-मराठी अशा शब्दकोशाची निर्मिती करून घेतली. तो ‘राज्यव्यवहार कोश’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर राज्याभिषेकाच्या दिवसापासून महाराजांनी तत्कालीन शालिवाहन शक ऐवजी स्वत:च्या राज्याचे शक सुरू केले. हे नवीन शक ‘श्री राज्याभिषेक शक’ म्हणून अस्तित्वात आले, त्याला आपण ‘शिवशक’ से म्हणतो. त्याचा उल्लेख अनेक पत्रांवर पाहायला मिळतो. ही लोकशाही व्यवस्थाच होती. आजही महाराजांची शेकडो पत्रे उपलब्ध आहेत. या पत्रांवरूनच महाराजांनी आपले नाव राजश्री शिवाजीराजे भोसले हे बदलून श्री राजा शिवछत्रपती असे केले होते, हेही लक्षात येते. महाराजांनी आपल्या नावापुढे ‘छत्रपती’ म्हणजेच ‘छत्र धारण करणारा, छत्राचा अधिपती’ अशी बिरुदावलीही लावून घेतली होती.

अखंड भारतात आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, त्याचबरोबर पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच या सर्वांशी त्यांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रुचा शास्त्रशुद्ध अभ्यास करुन त्यांचा पराभव करण्याची रणनीती आखली होती. महाराजांनी मावळ्यांना सोबत घेवून स्वराज्य स्थापन केले होते. राज्याभिषेकासारखा सोहळ्यात मावळ्यांना महत्वाचे स्थान होते. त्यामुळे राज्यातल्या प्रत्येकामध्ये हे राज्य आपलं आहे, अशी भावना होती.

महाराजांनी नूतन राज्याची जाणीव उत्पन्न करण्यासाठी आपला राज्याभिषेक करवून घेण्याचा संकल्प ठरविला. जेणेकरून रयतेच्या मनांत आपण स्वातंत्र्यात आहोत, याची जाणीव निर्माण होईल हा महाराजांचा हेतू होता. आपल्या माता-पित्यांची स्वप्न सत्यात उतरवून रयतेला जगण्याची उमेद देणारा तसेच शाश्वत जगण्याचा मार्ग दाखवणारा सोहळा अपेक्षेनुसार साकारला गेला. जगातील प्रत्येक देशाला स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक होय.

महाराजांनी ६ जून १६७४ ला जो राज्याभिषेक करून घेतला व स्वत: ‘छत्रपती’ ही बिरुदावली लावली, स्वत:वर छत्र धारण केले, राज्याभिषेक शकाची निर्मिती केली ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सार्वभौमत्व घोषित करण्याची कृती होती. आज आपण शिवराज्याभिषेक दिन साजरा करताना शिवछत्रपतींच्या कृतीतून स्वातंत्र्याची प्रेरणा घ्यायची की नुसते प्रतीकात्मक सोहळे साजरे करायचे याचा विचार केला पाहिजे. शिवाजी महाराजांची प्रत्येक कृती ही जनतेचे हित डोळ्यांसमोर ठेवून केलेली असायची. त्यांचे अष्टप्रधान मंडळ हे एक प्रतिनिधीमंडळच होते. स्वराज्याचे संरक्षण आणि संवर्धनासाठी ते झटत होते. शिवाजी महाराजांचा जनतेशी सुसंवाद होता. लोकांचे मनातले ओळखून महाराज निर्णय घेत. त्यामुळे लढायावर जात असताना जनतेच्या काडीलाही धक्का लागला नाही पाहिजे, असे त्यांचे फर्मान होते.
शिवाजी महाराजांच्या दृष्टीकोनांचा जेवढा बारकाईने अभ्यास होईल तेवढा शिवाजी महाराजांचे जनकल्याणाचे विचार आपणाला उमगत राहतील.
– *खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *