सोलापूर : विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या दौऱ्यामध्ये ‘हे शेतकऱ्यांचं सरकार असून शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत, जीवाचं काही बरं-वाईट करू नका’ असं भाष्य करत ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
मात्र, शेतकऱ्यांचा रोष वाढला असून मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष बांधावर शेतीचं झालेलं नुकसान बघावं आणि लवकरात लवकर नुकसान भरपाईची तरतूद करावी अशी उद्विग्न मागणी केली गेली. उद्धव ठाकरेंनी सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटपही केले. 11 नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोलापुरात धनादेश देण्यात आले. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेचं कौतुक देखील केलं गेलं.
आता, या धनादेशांच्या रक्कमेची वास्तविकता समोर आली असून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच करण्यात आली आहे. अनेकांचा संसार देखील उघड्यावर पडला असून सगळं वाहून गेल्याने खाणार काय? राहणार कसं? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. मुख्यमंत्र्यांनी काही निवडक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची व्यथा ऐकली. यानंतर काहींना धनादेश दिला. मात्र, आता हे धनादेश केवळ ३८०० रुपयांचा असल्याचं झी २४ तासच्या वृत्तातून समोर आलं आहे.
धनादेश प्राप्त झालेल्या शेतकऱ्याने खुद्द ही बाब सांगितली असून लाखोंचं नुकसान झालं आहे. ‘सगळं वाहून गेलं असताना फक्त ३८०० रुपयांचा चेक दिला आहे. तो तरी कशाला दिला? परत घ्या’ अशी निराशा व्यक्त केली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी याबाबत ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी आज केवळ ३८०० रुपयांचे चेक देऊन नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा केली. काय फालतुगिरी चालली आहे??’ असा हल्लाबोल राणेंनी केला आहे.
Leave a Reply