शहर पोलीसांतील एका अधिकाऱ्याची नाठाळ मर्दुमकी!* वाचा तुषार जगताप यांचा लेख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

✒️ *तुषार जगताप लिहितात …*

*शहर पोलीसांतील एका अधिकाऱ्याची नाठाळ मर्दुमकी!*

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाविषयी महाराष्ट्र सरकार सकारात्मक आहे,जवळपास सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनाही सकारात्मक आहेत,राज्य पोलीसांसह नाशिक पोलीस आयुक्तालयही दोन पोलीस अधिकारी आणि त्यांचे पंटर पोलीस कर्मचारी यांचा अपवाद वगळता सकारात्मक आहे.मग गेल्या अनेक वर्षापासून आपल्या न्याय मागण्यांसाठी सहनशीलते पलिकडच्या शांततेत रस्त्यावर संघर्ष करणारा हा समाज केवळ या दोन पोलीस अधिकाऱ्यांनाच का सलतो? काय बिघडवलंय मराठा समाजानं या मंडळींचं? खरं तर या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या आजवरच्या पोलीस सेवेत मराठा समाजानं जेव्हढं सांभाळलं,जेवढे सहकार्य केलं तेव्हढं सहकार्य अन्य कुणाकडून झाले असेल अशी या मंडळींची एकूण पाञताच नाही.आम्ही अगदी पुराव्यानिशी हा दावा करतो आहोत.मराठा समाज सर्वच घटकांना सामावून घेतो हा इतिहास आहे.तरीही काही नाठाळ प्रवृत्ती मराठा समाजाला पाण्यात पाहून सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात आणि अखेर तोंडघशी पडतात.अगदी आमचे आराध्य दैवत राजे छञपतींनाही याच प्रवृत्तींनी स्वराज्य निर्मिती- संवर्धनात अडचणी आणल्यात हे सर्वश्रूत आहे.त्याच प्रवृतीची पिलावळ आज मराठा समाजाच्या न्याय हक्कांना मांजरीसारखं आडवं जाण्याचं पाप करीत आहे.अर्थात या नाठाळ प्रयत्नवाद्यांना आपण तोंडावर आदळणार याची जाणीव असतांनाही हा प्रमाद ते जाणीवपुर्वक करतात.या प्रकरणातही तोंडावर आपटण्याची शक्यता गृहीत धरूनच आपल्या अधिकाराच्या पलिकडे जाऊन अहंकार गाजविण्याची खुमखुमी दाखवून पोलीस आयुक्तालयातील या वरिष्ठ अधिकाऱ्यानं भद्रकाली पोलीसांना मराठा समाजाच्या रोषाला बळी पाडलं आहे. होय! भद्रकाली पोलीस निरिक्षकांनी मराठा समन्वयकांवर गुन्हे दाखल केलेत हे वास्तव असले तरी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा दबाव होता म्हणून हे गुन्हे दाखल झाल्याची आमची पक्की खाञी आहे.म्हणूनच आम्हालाच नव्हे तर सकल मराठा समाजाला खंत वजा प्रश्न पडला आहे की- *या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला मराठा समाजाविषयी एव्हढी असूया किंवा चिड का?*

पहिला प्रश्न हा आहे की,मराठा क्रांती मोर्चानं शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनानं कुठली शांतता भंग झाली होती? कुठली कायदा सुव्यवस्था धोक्यात आली होती?या आंदोलनात कुठले समाजकंटक,सामाजिक गुन्हेगार किंवा अवैध धंद्यांशी संबधित मंडळी सहभागी झाली म्हणून या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तिकडचा वचपा इकडे काढण्यासाठी सकल मराठा समाजावर सुड उगविण्याचा प्रमाद केला?..

कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर,मास्क वगैरेशी संबधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे धाडस फक्त आणि फक्त मराठा आंदोलनात दाखवून या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कुठली मर्दुमकी दाखविली?

शहरात अनेक आंदोलनं होतात,अनेक खासगी,शासकीय कार्यक्रम होतात. एव्हढचं कशाला मंञी महोदयांचे दौरे, ,आढावा बैठकीमधून ही सारी नियमावली एव्हढ्या काटेकोरपणे पाळली जाते का? तेंव्हा कुठे जाते या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची मर्दूमकी?

नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचा आदर्श इतिहास आहे.अगदी सन २०१६ पासून असंख्य आंदोलन झाली.लाखोंचे मोर्चे झाले.याच काळात अन्य शहरात झालेल्या आंदोलनांदरम्यान अशाच काही नाठाळ प्रवृत्तींच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आगळीकीमुळे हिंसक वळण लागत असतानाही नाशिक शहर आणि जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी नाशिक शांत ठेवले,त्याचे मुळ कारण समन्वयक आणि पोलीस यंञणेत असलेला समन्वय.अगदी शुक्रवारी पार पडलेल्या आंदोलनापर्यंत हा समन्वय कायम आहे.अर्थात या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या अहंकारामुळे हा समन्वय तसूभरही कमी होण्याची शक्यता नाही.असो,तर मुळ मुद्दा हा आहे की,हे आजवरच्या सर्वच पोलीस आयुक्त ,उपायुक्त,सहाय्यक पोलीस आयुक्त ,पोलीस निरिक्षक इतकेच नाही तर पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील मराठा क्रांती मोर्चाला भरभरून सहकार्य दिले आहे.तीच परंपरा नव्याने रूजू झालेले पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनीही पुढे अशीच सुरू ठेवण्याच्या उद्देशानं मराठा समन्वयकांशी अनेकदा चर्चा केली.परस्परांना सहकार्य करून लोकशाही मार्गानं शांततेत आपला हक्क मागण्याचा अजेंडा राबवण्यास शहर पोलीसांनी कुठलाच अडसर आणला नव्हता.शुक्रवारच्या आंदोलनासाठीही पोलिसांकडे रितसर परवानगी मागण्यात आली होती. प्रारंभी परवानगी नाकारली. त्यानंतर पोलिसांशी चर्चा झाली. त्यात शांततेत निवेदन देण्याची विनंती मान्य करण्यात आली होती. त्यानुसारच सर्व उपक्रम पार पडले. . आमचे आंदोलन अत्यंत शांततापूर्ण झाले. तरीही या नाठाळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या हट्टापायी भद्रकाली पोलीसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांवर गुन्हे दाखल केलेत.
का? का केला असेल या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हा खोडसाळपणा? बरं आपल्या कर्तव्याप्रती हे वरिष्ठ पोलीस अधिकारी खुप प्रामाणिक आहेत असा त्यांचा सेवा इतिहास नाही.खोडसाळपणा करून खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी आपल्या कनिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्यात या महोदयांचा हातखंडा आहे.अशा खोडसाळपणामुळे गावपडी पडली आहे.या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने जिथे जिथे काम केले तिथे तिथे निर्दोष नागरिकांचे बळी घेतल्याचे अनेक दाखले आहेत.भद्रकालीसह आपल्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे,अवैध गुटखा,गोवंश तस्करी, अवैध कत्तल खाने अशा नाना बेकायदेशीर कृत्यांकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष करणारा हा वरिष्ठ पोलीस अधिकारी मराठा समाजावर एव्हढी खुन्नस का दाखवतो? पोलीस वर्दीची प्रतिष्ठा वाढविण्याची एव्हढीच इच्छा आहे तर आधी पडलेले डाग धुवून स्वच्छ करा.निर्दोष बळी घेतल्याचं प्रायश्चित घ्या.

जाता जाता एव्हढचं सांगतो- साहेब! मराठा समाज कनवाळू ,दयाळू,सहिष्णू आहे.स्वतःहून कधीच कुणाला डिवचत नाही.कुणाची खोडी काढीत नाही.अडचणीत आलेल्या गरजवंताच्या मजबूरीचा फायदा उठवत नाही.त्याला हात देऊन खड्ड्यातून बाहेर काढतो.माञ कुणी वाकडी नजर केलीच तर……..
आपण पेरतो तेच उगवते.कर्माची फळे प्रत्येकाला जीवंतपणीच मिळतात.हा तुमचा आमचा सर्वांचाच अनुभव आहे.खुर्ची आहे तो पर्यंत अधिकाराचा गैरवापर करून नसती शेखी मिरवू नका.क्षणिक समाधान लाभेल.वरिष्ठांची क्षणिक शाबासकीही मिळेल.पण वास्तव समोर येते तेंव्हा वरिष्ठही साथ देत नाही तेंव्हा मदतीला धावते ते आपले कर्म.निवृत्तीनंतर समाजातच वावरायचे आहे,तेंव्हा हाच समाज सुखदुःखात सोबत रहातो.कमावलेली संपत्ती कामी येत नाही.काही अनुभव आपणही घेतलेत.

तुर्तास इतकेच..!

*जय जिजाऊ !जय शिवराय!! जय शंभुराजे!!!*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *