वडूथ ते सातारारोड डांबर कम खडी जादा
सातारा । प्रतिनिधी
वडूथ ते सातारारोड येथील रस्त्याचे कामकाज बांधकाम विभागातर्फे करण्यात येत आहे. पण हे कामकाज अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे येथील नागरिकांना दिसून येताच वडूथ येथील नागरिकांनी ते काम बंद पाडले. डांबर न टाकताच फक्त खडी टाकून रस्त्याचे काम उरकणार्या ठेकेदाराचे पितळ उघड पाडले. बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना याबाबत संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद न देता मोबाईल बंद केले. डांबर कम खडी जादा असा नाही तर काम करावयाचे असल्यास योग्य दर्जाचे करावे, अशी मागणी वडूथकरांनी यावेळी केली.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन निकम, विकास साबळे, प्रकाश साबळे आदी उपस्थित होते. खडी टाकण्यापूर्वी रस्त्यावर डांबर न टाकताच केवळ खडीच टाकण्यात आली आहे. अशा प्रकारचे काम येत्या पावसाळ्यात कसे टिकणार नाही. याविरोधात प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा मदन साबळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन निकम यांनी दिला.
याबाबत बांधकाम विभागाचे अधिकार्यांना कळवले असता उडवाउडवीची उत्तरे दिली तर अभियंता मुनगट्टीवार यांनी तर लेखी स्वरुपातील अर्ज द्या, असा सल्ला दिला यावर स्थानिकांनी संताप व्यक्त केला. या कामाकडे या विभागाचा एक ही अधिकारी एकवेळ ही फिरकत नाही. बांधकाम विभागाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा वडूथकरांनी दिला आहे.
यावेळी ठेकेदार राजेशिर्के याला बांधकाम विभागाचे सुपरवायझर सोमनाथ चव्हाण यांनी निकृष्ट काम पाहून ते बंद करण्याचा आदेश दिला. यावेळी ठेकेदार राजेशिर्के यांनी काम बंद करणार नाही. अशी काम बंद करणारी खूप पाहिली आहेत, असे वडूथकरांना आवाहन दिले. यावरुन गावकर्यांनी निकृष्ट काम करुच देणार नाही, असा निर्धार देत उलट आवाहन दिल्याने आता रस्त्यावरुन ठेकेदार आणि ग्रामस्थ गुरुवारी आमने सामने येण्याची शक्यता वाढली आहे.
निकृष्ट रस्ता की गेली नोकरी
टक्केवारीसाठी अधिकारी कधीच ठेकेदारला बोलत नाहीत. उलट त्याची वकिली करताना दिसतात. यापुढे रस्त्याचे काम निकृष्ट झाले की अधिकार्याला दोषी ठरवून नोकरी गेली पाहिजे. कामाच्या गुणवत्ता, दर्जा राखण्याची जबाबदारी असतानाही अधिकारी फिल्डवर येत नाहीत. त्यामुळे निकृष्ट काम होत राहणार. रस्त्याच्या कामाची तपासणी करण्यासाठी आणि अधिकारी, ठेकेदारावर कारवाईसाठी कायदेशीर दाद मागणार असल्याचे मदन साबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.












Leave a Reply