कराडच्या चारुदत्त साळुंखे याची भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये संशोधक म्हणून निवड !!!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा प्रतिनिधी : धनंजय माने-पाटील

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील इतिहास घडवू शकतात याचंच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे चारुदत्त साळुंखे !
मूळचे चाफळ (ता.पाटण जि. सातारा) सारख्या ग्रामीण भागातील रहिवासी असणाऱ्या आणि प्राथमिक शिक्षण आदर्श प्राथमिक विद्यामंदिर कराड येथून पूर्ण करुन इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल कराड येथून दहावीला ९४.५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण करणाऱ्या चारुदत्त साळुंखे याची यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चीतच प्रेरणादायी आहे. खाजगी संस्थेत क्लर्क असणाऱ्या मध्यमवर्गीय मोहनराव साळुंखे आणि प्राथमिक शिक्षक असणाऱ्या सौ.संगिता साळुंखे यांचा मुलगा चारुदत्त साळुंखे याने दहावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण घेऊन शैक्षणिक वाटचालीस सुरुवात केली. दहावीनंतर SGM कॉलेज कराड येथून ९२.३३ टक्क्यांसह विज्ञान शाखेतून बारावी पुर्ण केली, बारावी विज्ञान शाखेतूनच MHT-CET परीक्षेत १८४ गुण मिळवून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या अटॉनॉमस कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. CoEP कॉलेजमधून शेवटच्या वर्षाला असताना एकाहून एक वरचढ प्रायव्हेट कंपन्यामधून नोकरीच्या संधी हातात असतानादेखील खाजगी क्षेत्रात जॉब न करता ज्या क्षेत्रातून आपण राहतो त्या समाजाला पर्यायाने आपल्या देशाला फायदा होईल अशा क्षेत्रात म्हणजेच शासकीय सेवांत अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. समाजाप्रती , देशाप्रती असणारी बांधिलकीच चारुदत्त साळुंखे यांना वेगळं ठरवते. शासकीय सेवांचा म्हणजेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना टेक्नीकल क्षेत्राला निवडून अखिल भारतीय स्तरावर झालेल्या GATE 2020 या परीक्षेतून सबंध देशातून ४८ वा क्रमांक मिळवत यशाच्या कमानीत नवा विक्रम प्रस्थापित केला. या यशाच्या जोरावरच सबंध देशाच्या टेक्नीकल क्षेत्राला दिशा देणार्या भाभा अनुसंशोधन केंद्राच्या संशोधक पदाच्या मुलाखतीसाठी निवड झाली. तंत्रज्ञान संशोधन म्हणजेच टेक्नीकल रिसर्च इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात भाभा अनुसंशोधन केंद्रातील मुलाखत सर्वात कठीण समजली जाते. सबंध देशातील या क्षेत्रातील तज्ञ मुलाखतकार सर्वोत्कृष्ट अशा संशोधकांची निवड करतात , तब्बल दीड तास चाललेल्या मुलाखती मधून चारुदत्त साळुंखे तावून सुलाखून संशोधक म्हणून निवड होऊन यशस्वी झाले. मुलाखतीच्या अवघ्या एक महिना आधी वडील कोरोनाशी झुंज देऊन घरी परतले होते. अशा कठीण प्रसंगातही संयम न गमावता कुटुंबियांची काळजी घेत मुलाखतीची तयारी पुर्ण केली, आणि यशस्वीरीत्या मुलाखत देऊन निवड झाली. ग्रामीण भागाचा , आर्थिक परिस्थितीचा , कौटुंबिक गोष्टींचा अशा कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड मनात न ठेवता ध्येयाच्या दिशेने झपाटल्यासारखी वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळते हेच चारुदत्त साळुंखे यांच्या यशाचं गमक आहे.
सबंधित स्पर्धापरीक्षा आणि यातील संधी याविषयी प्रत्येक गरजूला मार्गदर्शन करण्याची तयारी असल्याचा शब्द चारुदत्त साळुंखे यांनी दिला आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल चारुदत्त साळुंखे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *