सातारा : राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 15 जानेवारीला सातारा जिल्ह्यातील तब्बल 900 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. तर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रत्येक गावाने आपल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आहावन जनतेला केले आहे.
आता त्यांच्या या आवाहनाला गावागावांतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपली आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात सुमारे ७५ ग्रामपंचायत आहे. यातील ३० ग्रामपंचायती निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान, अशा गावांना राज्यातून आणि विशेषकरुन केंद्रातून लोकसंख्येनुसार विशेष निधी उभा करुन विकासात्मक प्रोत्साहन देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे उदयनराजे भोसलेंनी सांगितले होते.
कोरोनाच्या संसर्गामुळे गेले 9-10 महिने शेतकऱ्यांसह संपूर्ण ग्रामीण भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका आल्यामुळे प्रथेप्रमाणे गावागावांत भांडणतंटे, चढाओढ पहायला मिळणार आहे. त्यामुळे कोविड विरोधात लढणारे पोलीस, प्रशासन, वैद्यकीय आरोग्य कर्मचाऱ्यांवर फार मोठ्या प्रमाणात ताण वाढणार आहे. हे टाळायचे असेल तर प्रत्येक गावाने आपल्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन उदयनराजे भोसलेंनी केले आहे.













Leave a Reply