*आला कमान*
गेल्या दोन वर्षांत काँग्रेसने अनेक राज्यांमधील सत्ताआणि अनेक प्रमुख नेते गमावले.ज्योतिरादित्य सिंदिया यांसारख्या अनेक प्रमुख नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. कर्नाटक असो वा मध्य प्रदेश, काँग्रेसला भाजपने राजकीय शह देऊन सत्ता मोडीत काढली . काँग्रेसच्या अस्थिरतेमुळे, आंतरिक मतभेदांमुळे त्यांना सत्ता चालवणे कठीण जात आहे याचे उदाहरण म्हणजे राजस्थानमधील सचिन पायलट विरुद्ध अशोक गेहलोत यांचा वाद.
पंजाब यासाठी अपवाद नाही. 2017 मध्ये सरकार स्थापन झाल्यापासूनच पंजाब काँग्रेस मध्ये दोन गट पडले. एका गटाच नेतृत्व कॅप्टन अमरिंदरसिंग करत होते तर दुसर्या गटाचे नेतृत्व सिद्धू यांच्या हाती होते. या वादामुळे पंजाब काँग्रेस ला प्रदेशाध्यक्ष पासून ते मुख्यमंत्री बदलावा लागला. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आणि पंजाबमध्ये एका नवीन राजकीय नाट्याची निर्मिती झाली आणि या नाटकाचे दिग्दर्शक होते सिद्धू ! राजकीय पटलावर चर्चांना उधाण आले की सिद्धू पंजाब चे नवीन “किंग” होऊन राज्याची ची धुरा सांभाळतील परंतु त्यांनी किंगमेकर च्या भूमिकेला पसंत केले आणि मुख्यमंत्री झाले चरणजीत सिंह चन्नी. चन्नी यांच्या माध्यमातून पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री मिळाला खरा परंतु काँग्रेसने “कॅप्टन साहब” यांना गमावले. दोन दिवसांपूर्वीच “मला काँग्रेसमध्ये राहायची इच्छा नाही , तेथे ज्येष्ठ नेत्यांचा ऐकले जात नाही” म्हणणारे कॅप्टन सिंग नवीन पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत असे मत अनेक जण वर्तवतात ,यासाठी त्यांना २०-२५ नेत्यांचा पाठिंबा सुद्धा आहे. भाजपा सोबत जाण आजच्या घडीला त्यांच्या हिताचे नाही. एक वेगळा पक्ष काढून पुढील वर्षात पंजाबमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला शह देउ शकतात , असे एकंदर दिसून येते.
2024 ची निवडणूक काँग्रेसला आपल्या पारड्यात टाकायची असेल तर काँग्रेसने त्यांच्या आंतरिक समस्यांवर लक्ष देऊन ते सोडवणे गरजेचे आहे. युवा नेत्यांना संधी देणे ही काँग्रेसची गरज बनली आहे. राहुल गांधी यांच्या पक्षप्रमुख पदाच्या राजीनाम्या नंतर काँग्रेसला अजूनही नेतृत्व लाभले नाही. जो कोणाला “आला कमान” च्या विरोधात बोलेल त्याच काँग्रेसमधील राजकीय भवितव्य धोक्यात आणले जात आहे याचे उदाहरण म्हणजे मिलिंद देवरा यांच्यासारखे अनेक काँग्रेसी नेते. राष्ट्रीय पक्षाची “पगडी” बाजूला ठेवून, विविध राज्यस्तरीय पक्षांसोबत आघाडी करण्यामध्ये काँग्रेसचे हित आहे. “एकला चोलो रे” ची भूमिका ही काँग्रेससाठी घातक ठरेल, असे अनेक राजकीय विश्लेषकांच मत आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी सुचवलेले बदल हे कदाचित काँग्रेससाठी फायद्याचे ठरतील.
– स्वप्निल वाघ
waghswapnil2015@gmail.com
*आला कमान* – स्वप्निल वाघ
















Leave a Reply